यमुनानगर: आशियातील सर्वात मोठी सरस्वती साखर कारखान्याने ऊस गळीत हंगाम समाप्त केला आहे. या हंगामात कारखाना १८१ दिवस चालला आणि १६६.३६ लाख क्विंटल उसाचे गाळप करण्यात आले. गेल्यावर्षी १६२ लाख क्विंटल उसाचे गाळप करण्यात आले होते. दरम्यान, यंदा ऊस दरवाढीसाठी शेतकऱ्यांनी ७ दिवस आंदोलनही केले. कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक एस. के. सचदेव यांनी सांगितले की, गेल्या वर्षी साखरेचे उत्पादन १५ लाख ४३ हजार क्विंटल झाले होते. तर यंदा १६ लाख २५ हजार क्विंटल साखर उत्पादित करण्यात आली आहे.
पंजाब केसरीमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, यंदा ९० हजार क्विंटल अतिरिक्त साखर उत्पादन झाले आहे. तर सरकारने ३.३० लाख क्विंटल साखरेच्या निर्यातीचे उद्दिष्ट दिले होते. ते पूर्ण करण्यात आले आहे. कारखान्याकडून बांगलादेश, इंडोनेशिया, अफगाणिस्तान या देशात निर्यात केली जाते. एस. के. सचदेव यांनी सांगितले की, डिसेंबर २०२१ मध्ये इथेनॉल प्लांटची स्थापना करण्यात आली होती. सध्या प्रती दिन १ लाख लिटर उत्पादन केले जाते. सरकारची वाढती मागणी पाहता कारखान्याने क्षमता वाढीची मागणी केली होती. यास मंजूरी मिळाली असून आता प्रती दिन १ लाख ६० हजार लिटर इथेनॉलचे उत्पादन केले जाईल. २०२२ पर्यंत १० टक्के इथेनॉल पेट्रोलमध्ये मिश्रण करण्याचे उद्दिष्ट सरकारसमोर होते. आता २० टक्क्यांचा टप्पा गाठला जाणार आहे. त्यासाठी इथेनॉल प्लांटच्या स्थापनेसह सध्याच्या प्लांटची क्षमताही वाढविण्यात येत आहे. साखरेच्या दरातीच चढ-उतार पाहता सरकारने साखरेचा दर बाजारातील स्थितीशी समायोजित करण्याची गरज आहे, अशी अपेक्षा सचदेवा यांनी यावेळी व्यक्त केली.