कोल्हापूर : गेल्या हंगामातील ४०० रुपयांचा फरक आणि यंदाच्या हंगामात साडेतीन हजार रुपये पहिली उचल मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेले आंदोलन आता तीव्र झाले आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांना खर्डा भाकरी आंदोलन सुरू आहे. या अंतर्गत शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील महिलांनी आमदार प्रकाश आवाडे यांना खर्डा – भाकरी दिली. यावेळी आमदार आवाडे आणि महिला पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला.
दिपावली भाऊबीज निमित्त स्वाभिमानी महिला आघाडीच्यावतीने आमदार आवाडे यांना खर्डा भाकरी देवून ओवाळणी करण्यात आली.
आमदार आवाडे यांनी महिलांना उद्धट उत्तरे दिल्याचा आरोप महिला आघाडीने केला. तुम्ही चुकीच्या वेळी आंदोलने करत आहात, आम्हाला पैसे द्यायला जमत नाही, दंगा करायचा नाही… एकेकाने बोलायचं अशा शब्दात आवाडे बोलल्याने वाद झाला. सोबत गेलेल्या कार्यकर्त्यांनाही ते उद्धटपणे बोलल्याची माहिती सुवर्ण अपराज यांनी माहिती दिली. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना कागल तालुक्यातील महिलांनी खर्डा-भाकरी देवून ओवाळणी केली. महिला आघाडीच्यावतीने पालकमंत्री मुश्रीफ यांना लवकरात लवकर ऊस दराचा निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सरकार व कारखानदारांनी वाऱ्यावर सोडले आहे असा आरोप यावेळी महिलांनी केला.