अहमदनगर : कमी पाऊस, उसाला तुलनेने मिळणारा कमी दर, ऊस तोडणीतील अडचणी यामुळे ऊस उत्पादक शेतकरी इतर नगदी पिकांकडे वळला आहे. त्यामुळे यंदा उसाचे उत्पादन ३० टक्के घटणार आहे. त्यामुळे उसाचे आगार अशी ओळख असलेल्या नेवासा तालुक्यात यंदा ऊस टंचाई निर्माण होणार आहे. साखर कारखान्यांना जास्तीत जास्त ऊस मिळवण्यासाठी दर देण्यासाठी स्पर्धा करावी लागणार आहे.
ऊस उत्पादन खर्चात झालेली वाढ, सतत खंडित होणारा वीजपुरवठा, बिबट्या व रानडुकरांचा त्रास, आणि त्यानंतर पिकविलेल्या उसाला चांगला दर मिळत नाही. दर अधिक मिळण्याची गरज आहे असे रांजणगावचे ऊस उत्पादक शेतकरी नीलेश शिंदे यांचे म्हणणे आहे. तर नेवासा तालुक्यात २० हजार हेक्टर क्षेत्रावर उसाचे पीक असते. कमी पावसामुळे यंदा फक्त ५ हजार हेक्टर क्षेत्रावर आडसाली उसाची लागवड झाली आहे. हुमणी अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मे महिन्यात उपाययोजना करण्यात आली होती, असे नेवासाचे तालुका कृषी अधिकारी धनंजय हिरवे यांनी सांगितले.
दरम्यान, यंदा ऊस तोडणी व वाहतूक दरात वाढ करण्याची मागणी ऊस तोडणी कामगार व वाहतूक संघटनेतून होत आहे. तर शेतकरी संघटनेने उसाला तीन हजार रुपये प्रतिटन दर देण्याची मागणी केली आहे. साखर कारखान्यांना ऊस टंचाईचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे दरासाठी अधिक प्रयत्न कारखान्यांना करावे लागतील.