कोल्हापूर : ऊस तोडणीसाठी बीड, सांगोला, सोलापूरसह मराठवाडा, कर्नाटकातून आलेल्या कामगारांच्या तांड्यांना परतीचे वेध लागले आहेत. अनेक साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अखेरच्या टप्प्यात आला आहे. काही कारखान्यांच्या गळीत हंगामाची नजिकच्या काळात सांगता होत आहे. त्यामुळे ऊस तोडीचे काम संपल्यावर संबंधित तांड्यांचा वाहतूक ठेकेदार हा तांड्यातील सर्वांना सन्मानाने आहेर माहेर करून, भोजनाची व्यवस्था करून त्यांच्या भागात पोहोचविण्याची व्यवस्था करीत आहेत.
दरवर्षी पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस तोडणीसाठी सोलापूर, बीड, लातूर, विजापूर यासह कोकणातून ऊसतोड कामगार येतात. प्रत्येक हंगामात ऊसतोडणी कामगार गावाकडील शेतीची कामे आटोपून सप्टेंबरपासून येथे दाखल होतात. मे महिन्याच्या अखेरपर्यंत हंगाम चालू राहत असल्याने त्यांना चांगले उत्पन्न मिळते. या कामगारांमधील महिलाही अहोरात्र कष्ट करतात. आता हंगाम संपत आल्याने त्यांना परतीचे वेध लागले आहेत.