बीड : ऊसतोड कामगारांचे आरोग्य सुधारण्यासाठी पुढाकार घेण्याचा निर्धार तालुक्यातील अंगणवाडी सेविका व आशाताईंच्या पोषण आहार व आरोग्य या विषयावरील एकदिवसीय प्रशिक्षणावेळी करण्यात आला. धारूर तालुक्यातील ऊसतोड कामगारांचा आहार व आरोग्य बळकट व्हावे यासाठी शासनाच्या विविध उपक्रमांची माहिती यावेळी देण्यात आली. या प्रशिक्षणाला १८ गावांतील ८४ अंगणवाडी सेविका व आशाताईंची उपस्थिती होती.
प्रकल्प संचालक आप्पासाहेब उगले यांनी आरोग्य, बालकांचे लसीकरण, किशोरवयीन मुलींच्या आरोग्यबाबत घ्यावयाची काळजी या विषयांवर मार्गदर्शन केले. स्थलांतरित कुटुंबाचे ट्रेकिंग करण्यासाठी शासनाने महिला व बाल विकास कार्यालयांतर्गत एमटीएस ॲपची माहिती देण्यात आली. प्रा. हनुमान सौदागर यांनी आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याबाबत माहिती दिली. डॉ. सुंदर जायभाये यांनी स्थलांतरित महिला कामगारांनी गरोदर असताना कोणती काळजी घ्यावी, किशोरवयीन मुलींचे आरोग्य संतुलित ठेवण्याकरिता कोणता आहार घ्यावा, याविषयी मार्गदर्शन केले. सिंधू घोळवे उपस्थित होत्या. समन्वयक संतोष रेपे, प्रकाश काळे, सुनीता विभुते, शिवशंकर माने, राज करे, निवेदिता गवळी, अक्षय सिद्धवाल यांनी संयोजन केले.