मोहोळ : आम्ही अनेक साखर कारखान्यांना आर्थिक मदत केली आहे. आजपर्यंतचे सर्व कारखाने आम्ही याच पद्धतीने चालविले आहेत. आष्टी शुगर हा कारखाना शेतकऱ्यांचा आहे. कारखान्याला ऊस आणताना तो कुठल्याही काट्यावर वजन करून आणा. चोख काटा, योग्य दर व मस्टरच्या वेळच्या वेळी पगार ही आमच्या परिवाराची ख्याती आहे. या त्रिसूत्रीवरच गाळप हंगाम यशस्वी करू. चालू गळीत हंगामात पाच लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी १८ हजार हेक्टर ऊस उपलब्ध आहे अशी माहिती धनश्री परिवाराचे सर्वेसर्वा प्रा. शिवाजीराव काळुंगे यांनी दिली. आष्टी (ता. मोहोळ) येथील आष्टी शुगरचा २०२४-२५ या गळीत हंगामाचा मोळी पूजन सोहळा ह. भ. प. जयवंत बोधले महाराज यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून प्रा. काळुंगे बोलत होते.
कारखान्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा संचालिका डॉ. राजलक्ष्मी काळुंगे- गायकवाड प्रास्ताविक केले. त्या म्हणाल्या, अडचणीतला सीताराम कारखाना आम्ही चांगला चालविल्याने शेतकऱ्यांचा विश्वास द्विगुणित झाला. आष्टी शुगर ही त्याच धर्तीवर चालवू. तर हभप जयवंत बोधले महाराज यांनी आगामी काळात आष्टी शुगर हा कारखाना जिल्ह्यात अव्वल स्थानावर येईल, असा विश्वास व्यक्त केला. चेअरमन शोभा काळुंगे, संचालिका स्नेहल काळुंगे- मुदगल, दीपाली काळुंगे, कार्यकारी संचालक सुयोग गायकवाड, जनरल मॅनेजर भागवत कृष्ण मगर, मुख्य शेती अधिकारी तानाजी कदम, केमिस्ट व्ही. एस. यादव, डेप्युटी चीफ केमिस्ट ए. व्ही. मासाळ, डेप्युटी चीफ अकाउंटंट श्री. सुरवसे, टाइम कीपर दामाजी टोणपे, इलेक्ट्रिक इंजिनिअर समाधान फडतरे, विजय लवटे, महादेव पाटील आदी उपस्थित होते. सरपंच बलराज चव्हाण, विकास गिड्डे, कल्याण गुंड यांनी मनोगत व्यक्त केले. सुयोग गायकवाड यांनी आभार मानले.