नवी दिल्ली : भारतीय महिला हॉकी संघाला आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य फेरीत यजमान चीनकडून पराभव पत्करावा लागला. चीनने हा सामना ४-० अशा मोठ्या फरकाने जिंकला. या पराभवामुळे टीम इंडियाचे सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठण्याचे स्वप्नही भंगले. गेल्या वेळी 2018 मध्ये जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेतील विजेतेपदाच्या लढतीत जपानविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता.1998 मध्ये टीम इंडियाला दक्षिण कोरियाकडून पराभव पत्करावा लागला होता. भारतीय महिला संघाने 1982 पासून एकही सुवर्णपदक जिंकलेले नाही. आता त्यांची प्रतीक्षा आणखी वाढली आहे.
चीनसाठी पहिला गोल जियाकी झोंग जियाकीने तर दुसरा गोल झोऊ मीरोंगने केला. लियांग मेयूने तिसरा आणि गु बिंगफेंगने चौथा गोल केला. आता भारतीय संघ कांस्य पदकासाठी खेळणार आहे. 7 ऑक्टोबरला त्याचा सामना जपान किंवा दक्षिण कोरियाशी होणार आहे. भारतीय महिला संघाने आत्तापर्यंत ग्रुप स्टेजमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. पहिल्या सामन्यात सिंगापूरचा 13-0 असा पराभव केला. यानंतर मलेशिया विरुद्ध 6-0 असा विजय मिळवला. दक्षिण कोरियाविरुद्धचा तिसरा सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. त्यानंतर हाँगकाँगवर 13-0 असा मोठा विजय मिळवला. भारतीय महिला संघाने ग्रुप स्टेजमध्ये 33 गोल केले. त्यांच्याविरुद्ध फक्त एकच गोल झाला. गटातील एकही सामना संघ हरला नाही. उपांत्य फेरीतही त्यांना कामगिरीत सातत्य राखता आले नाही.