कोल्हापूर : भोगावती साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी इच्छुकांच्या राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. कारखाना निवडणुकीत गुरुवार हा माघारीचा एकमेव दिवस उरल्याने तुल्यबळ पॅनेल उभारणीसाठी नेत्यांचा उमेदवार निवडीत कस लागत आहे. इच्छुकांची संख्या जादा असल्याने माघारीसाठी प्रचंड रस्सीखेच सुरू आहे.
भोगावतीच्या संचालक मंडळाच्या २५ जागांसाठी १९ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. यंदाच्या निवडणुकीत सत्ताधारी आमदार पी. एन. पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील गट, माजी आमदार संपतराव पवार-पाटील शेकाप, जनता दलाचे वसंतराव पाटील आदी मंडळी एकत्र आली आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची संख्या सर्वाधिक आहे. २५ उमेदवार निवडण्यासाठी बैठका, मुलाखती सुरू आहेत. इच्छुकांना जिल्हा परिषद, पंचायत समिती, भोगावती शिक्षण प्रसारक मंडळावर वर्णी लावण्याचे आश्वासन दिले जात आहे.
सद्यस्थितीत विरोधी आघाडीच्या इच्छुक उमेदवारांनी माजी चेअरमन धैर्यशील पाटील व माजी चेअरमन सदाशिवराव चरापले, गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, हंबीरराव पाटील आदींसह भाजपकडे जावून उमेदवारी मिळविण्यासाठी फिल्डिंग लावली आहे. तर सत्तारुढ आघाडीतील इच्छुक फुलेवाडी येथे आमदार पी. एन. पाटील यांची भेट घेणे, सडोली येथे माजी आमदार संपतराव पवार-पाटील, सोळांकूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांची भेट घेऊन उमेदवारीची फिल्डिंग लावताना दिसत आहेत.
गेल्यावेळी कारखान्याची निवडणूक तिरंगी लढत झाली होती. आमदार पी. एन. पाटील यांच्या गटाने एकतर्फी विजय मिळवून सर्व जागा जिंकल्या होत्या. राष्ट्रवादी, शेकाप, भाजप, शिवसेना, जनता दल यांच्या दादासाहेब पाटील पॅनेल आणि माजी चेअरमन सदाशिवराव चरापले यांच्या पॅनेलला पराभव पत्करावा लागला होता.