दिसपूर : बांबूपासून बायोइथेनॉल उत्पादन करणारी देशातील पहिली बायो रिफायनरी युनिट ऑक्टोबरपर्यंत आसाममध्ये तयार होईल अशी अपेक्षा आहे, असे प्रतिपादन पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी केले. केरळ मोटर वाहन विभागाद्वारे आयोजित एका आंतरराष्ट्रीय ई-मोबिलिटी आणि वैकल्पिक ईंधन परिषद ‘इवॉल्व्ह-२०२३’ मध्ये बोलताना तेली यांनी सांगितले की, आसाममध्ये सार्वजनिक क्षेत्रातील नुमालीगढ रिफायनरीमध्ये काम गतीने सुरू आहे.
त्यांनी सांगितले की, मक्का आणि तांदळासारख्या अन्नधान्यापासून बायोइथेनॉलचे उत्पादन केले जात आहे. मात्र, हे बांबूपासून इथेनॉल उत्पादन करणारे पहिले युनिट असेल. आता आम्ही १२ टक्के इथेनॉल मिश्रण करीत आहोत. आणि २०२५ पर्यंत ते २० टक्क्यांपर्यंत घेवून जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. तेली यांनी सांगितले की, इंधन आयातीवरील देशाचे अवलंबित्व कमी करण्यासाठी हरित हायड्रोजन आणि वैकल्पिक इंधनासारख्या पर्यायांचा शोध महत्त्वपूर्ण आहे. ते म्हणाले की, देश आपल्या कच्च्या तेलाची गरज भागविण्यासाठी ८३ टक्के आयातीवर अवलंबून आहे. हे अवलंबित्व कमी करण्याची गरज आहे.