पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील पारगाव तर्फे अवसरी गावात भीमाशंकर साखर कारखाना परिसरात विशेष मतदार जनजागृती अभियान राबविले जात आहे. या अंतर्गत तहसील कार्यालय, आंबेगाव स्वीप पथकाच्यावतीने भीमाशंकर साखर कारखाना परिसरातील ऊस तोडणी कामगारांच्या झोपड्यांमध्ये जाऊन मतदानाविषयी जनजागृती करण्यात आली. अवसरी गावात आठवडे बाजार, शासकीय कार्यालये, बँका आदी भागांत जनजागृती करण्यासाठी पोस्टर चिकटविण्यात आली. पथकाच्यावतीने तालुक्यात यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये कमी मतदान झालेल्या गावांत जाऊन मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
आंबेगाव मतदारसंघाचे स्वीप नोडल अधिकारी सुनील भेके यांनी सांगितले की, पथकाच्या वतीने परिसरात दाखल झालेल्या ऊसतोडणी कामगारांमध्ये मतदार जनजागृती करण्यात आली. यावेळी उपस्थित ऊसतोड मजुरांनी आम्ही २० नोव्हेंबर रोजी मतदानासाठी आपापल्या गावी जाऊन मतदानाचा अधिकार बजावू, असा संकल्प केला. पथकाच्या जागृतीनंतर कामगारांनी मतदान करण्याचा निर्धार केला आहे. पथकातील तुषार शिंदे, सुरेश रोंगटे, अशोक लोखंडे, नारायण गोरे, राहुल रहाटाडे, विनायक राऊत उपस्थित होते.
साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.