विधानसभा निवडणूक निकाल : राज्यात बड्या बड्या साखर कारखानदारांना पराभवाचा धक्का, काहींचा निसटता विजय

कोल्हापूर : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत अनेक साखर कारखानदारांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.बहुतांश साखर कारखानदारांनी या निवडणुकीत नशीब आजमावले. त्यामध्ये काहींना आमदारकीचा गुलाल लागला तर काहींना मतदारांनी नाकारल्याचे दिसले.मातब्बर नेत्यांना पराभवाचा धक्का बसल्याचे निकालातून समोर आले आहेविधानसभा निवडणूक निकालाचा परिणाम साखर कारखान्यांच्या राजकारणावर होण्याची शक्यता आहे.

राजेश टोपे, बाळासाहेब पाटील, धीरज देशमुख, बाळासाहेब थोरातांना धक्का…

यंदाच्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत साखर उद्योगाशी संबंधित सुमारे 75 पेक्षा जास्त उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. साखर उद्योगाशी संबधित प्रमुख पराभूत उमेदवारांमध्ये माजी सहकारमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) चे नेते बाळासाहेब पाटील, माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे, मांजरा साखर परिवाराचे धीरज देशमुख, कोल्हापूरच्या बिद्री कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, सा. रे. पाटलांचे वारसदार गणपतराव पाटील, कागलच्या शाहू समूहाचे प्रमुख समरजितसिंह घाटगे, अशोकबापू पवार, संग्राम थोपटे, हर्षवर्धन पाटील आदी साखर उद्योगातील दिग्गज नेत्यांचा पराभव झाला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, ‘भीमाशंकर’चे सर्वेसर्वा सहकारमंत्री दिलीपराव वळसे पाटील, ‘विठ्ठलचे अभिजित पाटील, राजाराम कारखान्याचे अध्यक्ष अमल महाडिक, राहुल कुल, राहुल आवाडे, वारणा समूहाचे नेते विनय कोरे, रोहित पवार आदींनी विजय खेचून आणला आहे.

अजित पवार, वळसे-पाटील, रोहित पवार यांना लागला विजयी गुलाल…

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अधिपत्याखाली खासगी आणि सहकारी असे दोन्ही प्रकारचे साखर कारखाने आहेत.अजित पवार यांना १ लाख ८१ हजार १३२ मते मिळाली, तर युगेंद्र पवार यांना ८०, २३३ मते मिळाली.अजित पवार यांचा 1 लाखावर मताधिक्क्यानी विजय झाला.विद्यमान सहकारमंत्री दिलीपराव वळसे-पाटील हे अटीतटीच्या लढतीत आंबेगाव मतदारसंघातून विजयी झाले. त्यांनी शरद पवार यांच्या पक्षाचे देवदत्त निकम यांचा सुमारे दीडहजार मतांनी पराभव केला. माजी सहकारमंत्री आणि शरद पवार यांच्या पक्षाचे नेते बाळासाहेब पाटील यांचा कराड उत्तर मतदारसंघातून भाजपच्या मनोज घोरपडे यांनी तब्बल ४३,६९१ मतांनी एकतर्फी पराभव केला.कराड दक्षिण मतदारसंघातून कृष्णा साखर कारखान्याचे सर्वेसर्वा सुरेश भोसले यांचे पुत्र, भाजप नेते डॉ.अतुल भोसले यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा ३९,३५५ मतांनी पराभव केला.

हर्षवर्धन पाटील यांना पुन्हा पराभवाचा धक्का…

काँग्रेसचे भगीरथ भालके आणि भाजपचे समाधान औताडे यांच्यात अटीतटीची लढत झाली आणि त्यात औताडे यांनी भालकेंचा ८४३० मतांनी पराभव केला. याठिकाणी शरद पवारांच्या पक्षाचे अनिल सावंत उभे होते, त्यांना १०२१७ मते मिळाली. इंदापूरमध्ये माजी मंत्री, राष्ट्रीय सह. साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांना पुन्हा पराभवाचा धक्का बसला.निवडणुकीच्या तोंडावर भाजप सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत ऐनवेळी जाण्याचा धोका त्यांनी पत्करला होता. मात्र त्यांचा पारंपरिक प्रतिस्पर्धी आणि अजित पवार यांच्या पक्षाचे दत्तामामा भरणे यांनी १९,४१० मतांनी पराभव केला. सोनई समूहाचे प्रवीण माने यांनी तब्बल ४० हजार मते घेतल्याने पाटील यांचा प्रभाव झाल्यचे बोलले जात आहे. कर्जत जामखेडमधून बारामती ॲग्रोचे संचालक रोहित पवार यांना निसटता विजय मिळाला. त्यांनी भाजपच्या राम शिंदे यांच्यावर अवघी १२४३ मतांची आघाडी घेतली. याच ठिकाणी आणखी एक रोहित पवार (अपक्ष) उभे होते. त्यांना ३४८९ मते मिळाली आहेत.

काही विजयी साखर कारखानदार –

अजित पवार, दिलीप वळसे पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, जयंत पाटील, राहुल आवाडे, अभिजित पाटील, अमल महाडिक, राहुल कुल, डॉ. विनय कोरे, रोहित पवार, विक्रम पाचपुते, सुरेश धस, संभाजी निलंगेकर, अभिमन्यू पवार, राणा जगजितसिंग पाटील, सुभाष देशमुख, समाधान औताडे, डॉ. अतुलबाबा भोसले, शिवेंद्रराजे भोसले, अमल महाडिक, सत्यजित देशमुख, राहुल आवाडे, मोनिका राजळे, राहुल जगताप, मकरंद पाटील, विश्वजित कदम, अमित देशमुख इ.

काही पराभूत साखर कारखानदार –

बाळसाहेब थोरात, बाळासाहेब पाटील, हर्षवर्धन पाटील, गणपतराव पाटील, युगेंद्र पवार (शरयू ॲग्रो), संग्राम थोपटे, ए.वाय. पाटील, समरजित घाटगे, प्रभाकर घार्गे, जयप्रकाश दांडेगावकर, राजेश टोपे, मानसिंग खोराटे.

साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here