मुजफ्फरनगर : रालोदचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या ऊस थकबाकीप्रश्नी ऊस समिती कार्यालयाच्या परिसरात धरणे आंदोलन केले. आंदोलनस्थळी पोहोचलेल्या जिल्हा ऊस अधिकारी आणि भैसानाच्या बजाज साखर कारखान्याच्या उपाध्यक्षांनी शेतकऱ्यांना दोन दिवसांत २५ कोटी रुपयांची थकीत बिले अदा केली जातील असे आश्वासन दिले. याशिवाय, नवा गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी सर्व थकीत बिले दिली जातील असेही त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांचे हिस्सा प्रमाणपत्राची नक्कल केली जाणार नाही, ऊसाशी संबंधीत समस्या सोडविण्यासाठी शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले जाईल, असे सांगण्यात आले.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, रालोदचे आमदार राजपाल बालियान यांनी सांगितले की, एकीकडे शेतकऱ्यांची ऊस बिले थकीत आहेत. दुसरीकडे विज खाते आणि बँका शेतकऱ्यांकडून वसुली करीत आहेत. शेतकऱ्यांना नोटिसा दिल्या जात आहेत. विजेचे कनेक्शन तोडले जात आहे. भाजप सरकार शेतकऱ्यांचे शोषण करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. आंदोलनस्थळी आलेल्या जिल्हा ऊस अधिकारी आर. डी. द्विवेदी, समितीचे सचिव बि. के. राय, साखर कारखान्याचे उपाध्यक्ष जे. बी. तोरम, आमदार अनिल कुमार, राजपाल बालियान, माजी मंत्री योगराज सिंह, माजी खासदार राजपाल सैनी, तरसपाल मलिक आदींची चर्चा झाली. यावेळी २५ कोटी रुपये त्वरीत देण्याचा निर्णय झाला. नव्या गळीत हंगामापूर्वी ऊस बिले देण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन समाप्त करण्यात आले.