कोल्हापूर : हलकर्णी (ता.चंदगड) येथील अथर्व-दौलत साखर कारखान्याने चालू गळीत हंगामामधील १५ नोव्हेंबरअखेरची बिले प्रती टन ३१०० रुपयानुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केल्याचे कारखान्याचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी सांगितले. यंदा ऊस गळीत हंगाम उत्तमरीत्या सुरू असून अथर्व-दौलत कारखान्याने गाळपाचे योग्य नियोजन केले आहे. कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू आहे, अशी माहिती खोराटे यांनी दिली.
अध्यक्ष मानसिंग खोराटे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कारखाना कटिबद्ध आहे. सध्या उत्कृष्ट दर्जेदार कंपोस्ट खताची निर्मिती चालू आहे. कारखाना साईटवरून ते शेतकऱ्यांना माफक दरात वितरित करण्यात येईल. शेतकऱ्यांचा ऊस वेळेत कारखान्यात जावा यासाठी शेती विभागामार्फत तोडणी व वाहतूक यंत्रणेचे चांगल्या पद्धतीने नियोजन केले आहे. दरवर्षीप्रमाणे कारखान्याने ऊस बिले वेळेत आदा करण्याची परंपरा कायम ठेवली आहे. एफआरपीपेक्षा जादा रक्कम दिली जात आहे. यावेळी पृथ्वीराज खोराटे, कारखान्याचे संचालक विजय पाटील, युनिट हेड महेश कोनापुरे, सचिव विजय मराठे, प्रोसेस मॅनेजर रामपुरे, दयानंद देवाण, सुनील चव्हाण आदी उपस्थित होते.