सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील तेरामैल (बसवनगर) येथील लोकशक्ती साखर कारखाना चालविण्यास कोल्हापूरमधील अथर्व ग्रुपने पुढाकार घेतला आहे. या ग्रुपने २१ कोटी रुपयांची बँक गॅरंटीची रक्कम जमा केली आहे. अथर्व ग्रुप ऑफ शुगरला सीओसीने बँक गॅरंटी भरण्यासाठीचे पत्र दिले होते. त्यानुसार लोकशक्ती शुगरने २१ कोटी रक्कम जमा केली. उर्वरित रक्कम निर्धारित वेळेत बँक खात्यात जमा करण्याची हमी कंपनीने दिली आहे. सध्या अथर्व ग्रुपकडून कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथील दौलत साखर कारखाना चालवला जात आहे.
अथर्व ग्रुपने लोकशक्ती शुगर कारखाना १८५ कोटींना घेतला असून तो पुढील वर्षी सुरू करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी आणखी ५० कोटी खर्च अपेक्षित असल्याचे अथर्व ग्रुपचे सीएमडी मानसिंग खोराटे यांनी सांगितले. २०१६ साली कारखान्याचा चाचणी गाळप हंगाम घेण्यात आला. मात्र, उभारणीच्या टप्प्यात कारखाना बंद पडला. ‘लोकशक्ती शुगर’चा शिवजयंतीचा मुहूर्त साधून २०१६ साली कारखान्याचा चाचणी गाळप हंगाम घेण्यात आला. बँकांची देणी थकल्याने एनसीएलटीने कारखाना लिलावात काढला. कंपनीने कारखान्याची साइट आणि इतर बाबी अभ्यासल्यानंतरच ‘लोकशक्त्ती शुगर’ घेण्याचा निर्णय घेतला. हंगाम संपताच कारखान्याचे काम सुरू करणार आहोत, असे अथर्व ग्रुप ऑफ शुगरचे सीएमडी, मानसिंग खोराटे यांनी सांगितले.