कॅनबेरा : जगातील कच्च्या साखरेच्या निर्यातदारांमध्ये ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. कॅनग्रोअर्सचे चेअरमन पॉल स्कीब्री यांनी सांगितले की, अलिकडेच ऑस्ट्रेलियाने कच्च्या साखरेच्या निर्यातीत द्वितीय क्रमांकावर असलेल्या थायलंडला पिछाडीवर टाकले आहे. आता ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. लोकांना आता याबाबत आश्चर्य वाटू शकते की आम्ही साखर उद्योगातील एक महत्त्वपूर्ण भाग आहोत. आता आमच्यासमोर फक्त ब्राझील हा एकच प्रतिस्पर्धी आहे असे स्कीब्री यांनी सांगितले.
ऑस्ट्रेलियामध्ये जून महिन्यापासून साखरेचा हंगाम सुरू होईल. या हंगामात सुमारे २९.५ मिलियन टन ऊसाचे गाळप होईल आणि साधारणतः ४ मिलियन टन कच्च्या साखरेचे उत्पादन होईल असा अंदाज ऊस उत्पाकद शेतकऱ्यांचा आहे. येथे उत्पादीत होणाऱ्या साखरेपैकी ८५ टक्के साखर निर्यात केली जाईल. त्यामधून १.७ बिलियन डॉलरचे उत्पन्न मिळेल.
थालयंड सद्यस्थितीत आपल्या प्रमुख ऊस उत्पादक क्षेत्रामध्ये दुष्काळाचा सामना करीत आहे. थालयंडकडून २०२१ मध्ये फक्त २.६ मिलियन टन साखर निर्यात होण्याची शक्यता आहे. २०१९ मध्ये झालेल्या साखर निर्यातीच्या तुलनेत ती ४ मिलियन टनाने कमी आहे. ब्राझीलने गेल्या हंगामात २७.५ मिलियन टन साखरेची निर्यात केली होती.