कोल्हापूर : पावसाने मारलेली दडी, उसाच्या उत्पादनात झालेली घट पाहता यंदा सरासरी केवळ शंभर दिवसांचा ऊस गाळप हंगाम होईल, अशी शक्यता आहे. ऊस उत्पादन कमी होणार असल्याने यंदाच्या हंगामात मजुरांची समस्या भेडसावण्याची शक्यता नसल्याचे साखर उद्योगातील जाणकारांचे म्हणणे आहे.त्यातच दरवर्षी ‘केनकटर’ची संख्याही वाढत आहे. त्यामुळेही मजुरांवरील अवलंबित्व काहीसे कमी होणार आहे.
राज्यात गळीत हंगामात कारखान्यांना सुमारे १२ ते १५ लाख इतके मजूर लागतात. गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वीच काही महिने आधी तोडणी मजुरांचे अॅडव्हान्स बुकिंग केले जाते. बीड, नगर जिल्ह्यातून सर्वाधिक मजूर येतात. त्यापाठोपाठ नंदुरबार, धुळे, जळगाव, नांदेड, धाराशिव, परभणी, सोलापूर आणि सांगली जिल्ह्याच्या दुष्काळी पट्ट्यातील मजूर राज्यभर जातात. राज्यात अनेक ठिकाणी मजूर पुरविण्याच्या बहाण्याने कोट्यवधीचे फसवणुकीचे प्रकारही उघडकीस आले आहेत. राज्यातील छोटे शेतकरी स्वत ऊस तोडणी करून कारखान्याला पाठवतात.
यंदाचा हंगाम १ नोव्हेंबरला सुरु होईल, असे गृहीत धरल्यास जानेवारीच्या शेवटच्या किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हंगाम चालेल, अशी शक्यता आहे. मात्र, यंदा मजूर पट्ट्यातील जिल्ह्यांमध्ये फारसा चांगला पाऊस झालेला नाही. यंदाच्या पावसाने पिके कशीबशी तग धरुन आहेत. त्यामुळे उत्पादनात घट अपेक्षित आहे. कमी पावसाने पाणीसाठा झालेला नाही. त्यामुळे ऊस तोडणी मजूर यंदा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील, अशी शक्यता आहे. कारखाने ऊस तोडणी यंत्राला प्राधान्य देत असल्याचे दिसून आले आहे.