प्रतापगढ : जर इथेनॉल ६० टक्के आणि ४० टक्के विजेची सरासरी काढली तर पेट्रोल १५ रुपये प्रती लिटर दराने मिळू शकेल आणि लोकांना फायदा मिळेल असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. राजस्थानमधील प्रतापगढमध्ये एका रॅलीदरम्यान ते बोलत होते. गडकरी म्हणाले की, यामुळे प्रदूषण आणि आयात कमी होईल. देशात आता १६ लाख कोटी रुपयांची आयात केली जाते. हा पैसा शेतकऱ्यांच्या घरात येवू शकेल.
मेळाव्यात जनतेला संबोधित करताना गडकरी यांनी देशभरातील शेतकऱ्यांना “ऊर्जादाता” (ऊर्जा प्रदाता) बनण्याचे आवाहन केले. त्यांनी शेतकऱ्यांकडून उत्पादित इथेनॉलवर चालणाऱ्या नव्या कारचे लाँचिंग करण्याच्या योजनेबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, ही वाहने ६० टक्के इथेनॉल आणि ४० टक्के विजेच्या मिश्रणावर चालतील. त्यामुळे पेट्रोलचा खर्च जवळपास १५ रुपये प्रती लिटरपर्यंत कमी होईल. मंत्री गडकरी यांनी असेही सांगितले की, बजाज, टीव्हीएस आणि हिरो आदी कंपन्या १०० टक्के इथेननॉलवर चालणाऱ्या बाइक लवकरच बाजारात आणणार आहेत.