सांगली : कारखान्याने प्रभावीपणे राबविलेल्या ऊस विकास योजना आणि त्याला शेतकऱ्यांनी दिलेल्या प्रतिसादामुळे क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड साखर कारखान्याने राज्यात आपली वेगळी ओळख निर्माण केल्याचे मत ऊस तज्ज्ञ अरुण देशमुख यांनी व्यक्त केले. ते म्हणाले,
संपूर्ण महाराष्ट्राची सरासरी ऊस उत्पादकता एकरी २८ मेट्रिक टन आहे. पण एकट्या क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड साखर कारखान्याची सरासरी उत्पादकता एकरी ४७ मेट्रिक टनांची आहे. यावरूनच कारखान्याचे वेगळेपण लक्षात येते, असेही ते म्हणाले.
कुंडल (ता. पलूस) येथील क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड साखर कारखान्यावर आयोजित शेतकरी कर्मचारी प्रशिक्षण कार्यक्रमात देशमुख ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आ. अरुण लाड होते.
देशमुख म्हणाले, सुधारित ऊस पीक तंत्रज्ञान आत्मसात केल्यास उसाचे उत्पन्न वाढू शकते. एकरी किमान ६० मेट्रिक टनपेक्षा जास्त उत्पादन घेतले तरच ऊस पीक परवडते. ऊस पीक, लागण आणि खोडवा अशी घेऊन यासाठी सेंद्रिय तसेच हिरवळीची पिके घेतल्याने जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढविणे शक्य आहे. ऊस लागण टिपरीवर करण्यापेक्षा स्वतःच्याच क्षेत्रावर शुद्ध बियाण्यांचा वापर बेडवर करून रोपांची निर्मिती केली तर उत्पादन वाढविणे शक्य आहे. ठिबक सिंचन ने पाणी दिल्यास कमी खर्चात उत्पादन घेता येईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी उपाध्यक्ष दिगंबर पाटील, सुकुमार पाटील, अनिल पवार, बाळकृष्ण दिवाणजी, जयप्रकाश साळुंखे उपस्थित होते.