पुणे : पुणे प्रादेशिक साखर सहसंचालक नीलिमा गायकवाड यांची पणन संचालनालयातील पणन सहसंचालक पदावर अचानक बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या पदाचा अतिरिक्त पदभार साखर आयुक्तालयातील सह संचालक (उपपदार्थ) अविनाश देशमुख यांच्याकडे देण्यात आला आहे. त्याचबरोबर साखर आयुक्तालयातील रिक्त असलेल्या साखर सह-संचालकपदी (प्रशासन) अमरावती येथील विभागीय सह निबंधक प्रविण फडणीस यांची नियुक्ती शासनाने केलेली आहे. त्यांनी या पदाचा पदभार स्वीकारला आहे.
सातारा आणि पुणे या दोन जिल्ह्यातील कामे पुणे प्रादेशिक साखर सह संचालक कार्यालयातूनच पुढे जात असतात. काही कारखान्यांच्या निवडणुकांचे कामकाजही याच कार्यालय स्तरावरुन गेल्या काही महिन्यांत झाले आहे. पुणे आणि सातारा या दोन्ही जिल्ह्यांतील काही माजी मंत्र्यांशी संबंधित कारखान्यांच्या कामकाजाचा निपटारा वेळेत करण्यावरून या कार्यालयाबाबतच्या तक्रारींचा पाढा थेट सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे वाचण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेही काही तक्रारी केल्याचे समजते. त्यातून पुणे प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयातील बदल्या झालीची चर्चा आहे.