पुणे : ठरलेल्या मुदतीत शेतकऱ्यांना ऊस बिले देण्यात अपयशी ठरलेल्या चार साखर कारखान्यांना महाराष्ट्राचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी संपत्ती जप्त करण्याची नोटीस बजावली आहे. राज्यातील ५२ साखर कारखान्यांनी आतापर्यंत गाळप हंगाम संपुष्टात आणला आहे. आतापर्यंत ९५.७५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.
शनिवारी सोलापूरमधील दोन आणि सातारा तसेच बीड जिल्ह्यातील प्रत्येकी एक साखर कारखान्यांना साखर आयुक्तांनी नोटीस बजावली. शेतकऱ्यांना उसाचे पैसे वेळेवर देण्यात हे कारखाने अपयशी ठरले आहेत. त्यामुळे नोटीस बजावलेल्या साखर कारखान्यांची संख्या १७ झाली आहे. या कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे ६३७.५७ कोटी रुपये थकीत आहेत. आतापर्यंत राज्यातील १८७ साखर कारखान्यांनी एकूण ९२०.२३ लाख टन उसाचे गाळप केले आहे. या हंगामात महाराष्ट्रातील साखर उत्पादन १०० लाख टनापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. शुक्रवारअखेर १८७ पैकी ५२ साखर कारखान्यांनी या हंगामातील गाळप बंद केले आहे. यातील ३१ साखर कारखाने सोलापूर जिल्ह्यातील आहेत.