ऊस तोडणीस टाळाटाळ, शेतकऱ्यांनी साखर कारखाना कर्मचाऱ्यांना कोंडले

नांदेड : नोंदणी केलेल्या उसाची तोडणी वेळेवर होत नसल्याचा आरोप करत नांदेडच्या सावरगाव येथील शेतकऱ्यांनी अर्धापूर तालुक्यातील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या कार्यालयात कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवले. भाऊराव कारखाना नोंदीप्रमाणे ऊस तोडत नाही. शेतकऱ्यांनी इतर कारखान्याना ऊस द्यायचे म्हटले, तर त्यांची यंत्रणा ‘भाऊराव’चे प्रशासन येऊ देत नाही. ऊस लागवड करून चौदा महिने उलटले आहेत. आता उसाचे अक्षरशः चिपाड होत आहे, असा संताप शेतकऱ्यांनी व्यक्त केला. अखेर कार्यकारी संचालक व संचालक मंडळाने आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी कर्मचाऱ्यांना सोडून दिले.

सावरगाव येथील संतप्त शेतकऱ्यांनी भाऊराव चव्हाण सहकारी कारखान्याचे क्षेत्रीय कार्यालयात शेतकऱ्यांना कोंडले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हनुमंतराव राजेगोरे, संभाजी ब्रिगेड शेतकरी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संतोष गव्हाणे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कार्यकारी संचालक श्याम पाटील व संचालक मोतीराम पाटील यांनी चर्चा करून ऊस तोडणीचे आश्वासन दिल्यानंतर कार्यालयाचे बंद शटर खुले करण्यात आले. माझा ऊस नोंदीनुसार न तोडता इतरांचा का तोडता अशी विचारणा करणाऱ्या शेतकऱ्याच्या अंगावर ऊस तोडणी मशीन घालण्याचा प्रकार घडला. ऐनवेळी एका शेतकऱ्याने मला बाजूला ओढले, असा आरोप माधव किशन आबादार यांनी यावेळी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here