कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनानंतर गेल्या वर्षी गाळप केलेल्या उसाला अनुक्रमे ५० व १०० रुपयांचा दुसरा हप्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, हे दुसऱ्या हप्त्याचे पैसे किती कारखान्यांकडून कधी मिळणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे. कारण अद्याप एकाच कारखान्याने तसे हमीपत्र दिल्याचे समजते. जोपर्यंत कारखाने तसे हमीपत्र देत नाहीत, तोपर्यंत शेतकऱ्यांच्या पदरात ते पैसे पडणार नाहीत.
कोल्हापूर जिल्ह्यातील दत्त सहकारी साखर कारखाना वगळता एकाही कारखान्याने संमती पत्र दिलेले नाही. दुसऱ्या हफ्त्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळावेत यासाठी कारखानदारांनी असे सहमतीपत्र जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करायचे आहे. गेल्या वर्षीच्या हंगामामध्ये प्रती टन ३००० रुपयांपेक्षा जास्त दर दिलेल्या साखर कारखान्यांकडून प्रती टन ५० रुपये, तर त्यापेक्षा कमी दर दिलेल्यांकडून १०० रुपये दुसरा हप्ता दोन महिन्यांनंतर दिला जाणार आहे. यंदाच्या हंगामात ३,१०० रुपये प्रती टन असा पहिला हप्ता देण्याचा निर्णय झाल्यानंतर माजी खासदार राजू शेट्टी यांनी चक्काजाम आंदोलन मागे घेतले होते. दरम्यान, जोपर्यंत साखर कारखाने अशा प्रकारचे सहमतीचे पत्र देत नाहीत, तोपर्यंत साखर कारखाने सुरू करू दिले जाणार नाहीत, असा इशारा शेट्टी यांनी दिला आहे.