पुणे : येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यास सन २०२२-२३चा देश पातळीवरील को- जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया संस्थेचा ‘सर्वोत्कृष्ट सहवीज प्रकल्प’ हा देश पातळीवरील पुरस्कार संस्थेचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्या हस्ते पुणे येथे आयोजित सोहळ्यात प्रदान करण्यात आला.
शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे यांच्यासह ‘शाहू’चे संचालक यशवंत ऊर्फ बॉबी माने, सचिन मगदूम, सुनील मगदूम यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. शाहू साखर कारखान्यास सलग दुसऱ्या वर्षी हा पुरस्कार मिळाला आहे. कारखान्याला आतापर्यंत विविध ६८ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये राष्ट्रीय पातळीवरील २५ तर राज्य पातळीवरील ४३ पुरस्कारांचा समावेश आहे.
याबाबत ‘चीनीमंडी’शी बोलताना शाहू ग्रुपचे अध्यक्ष आणि भाजपचे नेते समरजित घाटगे म्हणाले कि, शाहू साखर कारखान्याने आपल्या आदर्श व्यवस्थापनातून राज्याच्या सहकार क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. शेतकरी सुखी व्हावा, यासाठी कारखाना सातत्याने अथक प्रयत्न करत आहे. पुरस्कारामुळे जबाबदारी आणखी वाढल्याचे घाटगे म्हणाले.