कोल्हापूर : भारतीय शुगरच्यावतीने राष्ट्रीय पातळीवरील ‘सर्वोत्कृष्ट साखर कारखाना’ पुरस्काराने रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्यास गौरविण्यात आले. कानपूरच्या नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटचे संचालक प्रोफेसर नरेंद्र मोहन यांच्या हस्ते कोल्हापूर येथे आयोजित शानदार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याच कार्यक्रमात ‘जयवंत शुगर्स’च्या शेतकऱ्यास पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
भारतीय शुगरचा पुरस्कार सोहळा कोल्हापूर येथे उत्साहात पार पडला. या सोहळ्यात कृष्णा कारखान्याच्यावतीने व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, संचालक धोंडीराम जाधव, संजय पाटील, बाबासो शिंदे, बाजीराव निकम, संभाजी पाटील, विलास भंडारे, कार्यकारी संचालक राम पाटील, मनोज पाटील, वैभव जाखले, जनरल मॅनेजर (टेक्निकल) बालाजी पबसेटवार यांच्यासह अधिकाऱ्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना उत्कृष्टपणे कार्यरत आहे.
कारखान्याने तांत्रिक, आर्थिक, प्रशासकीय व ऊसविकास, पर्यावरण संवर्धन या क्षेत्रामध्ये उत्कृष्टपणे कामगिरी केल्यामुळे भारतीय शुगरने या राष्ट्रीय पुरस्कारासाठी कृष्णा कारखान्याची निवड केली आहे. दरम्यान, कृष्णा सहकारी कारखान्याचे ऊसविकास अधिकारी पंकज पाटील यांच्या कृषीविषयक शोध निबंधाला उत्कृष्ट शोधनिबंधाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.