नाशिक : शेवरे येथील द्वारकाधीश साखर कारखाना येथे राज्यातील पहिले ऊस वाहतूकदार प्रबोधन शिबिर झाले. ऊस तोडणी व वाहतुकीची धावपळ गावोगावी सुरू आहे. रिफ्लेक्टर नसल्यास अंधारातील ऊस वाहतुकीची बैलगाडी किंवा ट्रॅक्टर ट्रेलर अजिबात दिसत नाही. त्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी प्रबोधन केले जात आहे. राज्याचे अप्पर पोलिस महासंचालक (वाहतूक) डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांच्या संकल्पनेनुसार हे शिबीर आयोजित करण्यात आले होते.
महामार्ग पोलीस अधिकारी, कर्मचारी व वाहन चालकांमधील गैरसमज टाळावा यासाठी प्रबोधन केले जात आहे. अवजड ऊस वाहतूकदार व इतर वाहनधारकांनी वाहने कमी वेगात चालवावे. वाहन नादुरुस्त झाल्यास वाहानाच्या मागील बाजूस ‘रिफ्लेक्टर’ लावून एलईडी लाइट लावावे. जेणेकरून रात्री, पहाटे होणारे लहान-मोठे अपघात टळण्यास मदत होणार आहे, असेही सांगण्यात आले. ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दरीकर, नाशिक विभागाचे उपअधीक्षक प्रदीप मैराळे यांच्या व मार्गदर्शनाखाली हे शिबिर झाले अशी माहिती महामार्गाचे धुळे विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांनी सांगितले. कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव सावंत, कार्यकारी संचालक सचिन सावंत, शेतकरी विभागाचे सतीश सोनवणे, उद्धव नहिरे, अनिल पाटील आदींनी अधिकाऱ्यांचे स्वागत केले.