सोलापूर : मंगळवेढा परिसराची दुष्काळी भाग म्हणून असलेली ओळख आवताडे शुगर्स ॲण्ड डिस्टिलरी प्रा. लि. नंदूरच्या माध्यमातून पुसली जाईल, असा विश्वास आमदार समाधान आवताडे यांनी व्यक्त केला. नंदूर येथे कारखान्याचा दुसरा गळीत हंगामाच्या बॉयलर अग्नी प्रदिपन सोहळा आमदार आवताडे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत, शेतकरी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार समाधान आवताडे म्हणाले की, जनकल्याणकारी कामे आणि विकासकामे या माध्यमातून मी माझे काम दाखवून दिले आहे. नंदुर येथील हा बंद साखर कारखाना आम्ही सुरू केला. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर देण्याच्या उद्देशाने आणि बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. येथे ऊस पुरवठा करणाऱ्या कारखान्यांना चांगला दर दिला जाईल. कामगारांना वेळेवर पगार केला जाईल. वाहतूकदारांची बिले त्वरित दिले जातील. आ. आवताडे म्हणाले की, तालुक्यातील असंख्य बेरोजगारांच्या हाताला काम मिळण्याच्या उद्देशाने एमआयडीसीची मंजुरी आम्ही आणली आहे. मंजुरीचे पत्र काही दिवसात मिळणार आहे. एमआयडीसीच्या माध्यमातून असंख्य उद्योजक, बेरोजगारांना काम मिळणार आहे. पंढरपूर शहरातील ड्रेनेज व्यवस्था ही चांगल्या प्रकारे कार्यान्वित करून कुठलेही गटार भरून वाहणार नाही याची काळजी घेतली जाईल.