कोल्हापूर : गेल्या दोन हंगामात उसाचे पूर्ण क्षमतेने गाळप न झाल्याने ‘ना नफा, ना तोटा’ तत्त्वावर कारखाना सुरू आहे. कारखान्यासमोरील आर्थिक अडचणी संपलेल्या नाहीत. साखरेबाबत केंद्र सरकारचे धोरण व साखर उद्योगातील चढ-उतार याचा कारखानदारीला बसत आहे. आगामी हंगामासाठी ४ लाख मे. टन ऊस उपलब्ध होण्याची शक्यता असून, कारखाना ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होऊ शकतो. जिल्ह्यातील इतर कारखान्यांच्या बरोबरीने दर देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष सुनील शिंत्रे यांनी केले. आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या ३३ व्या वार्षिक सभेत ताळेबंदावरून गोंधळ उडाला.
नोटीस व विषय पत्रिका वाचन प्र. कार्यकारी संचालक ज्योती यांनी केले. ज्योती अहवाल वाचन करीत असताना ताळेबंद पत्रकाला मंजुरीचा विषय आल्यानंतर कारखान्याचे तज्ज्ञ संचालक व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष तानाजी देसाई यांनी व्यासपीठावरूनच ताळेबंद आणि आर्थिक नफा-तोटा पत्रक बोगस व चुकीचे असल्याचे सांगितले. यावरून साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत गोंधळ झाला. अनेक सभासद देसाई यांच्या अंगावर धावून गेले. यावेळी आजरा साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार स्व. वसंतराव देसाई यांचे नाव साखर देणे. कारखाना परिसराला स्व. अमृतराव देसाई यांचे नाव देणे. कारखान्यामार्फत इथेनॉल व कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्प उभारणीला करणे या तीन ठरावांना सभासदांनी मंजुरी दिली.
इंद्रजित देसाई म्हणाले, सभासदांचे १२ कोटी २४ लाख रुपये देणे आहे. ही रक्कम शेअर्सकडे का वर्ग केली आहे?, यावर अध्यक्ष शिंत्रे यांनी शेतकऱ्यांची सर्व जुनी देणी देणार असल्याचे सांगितले. कॉ. संपत देसाई यांनी शेतकऱ्यांची जुनी देणी देण्याची तरतूद करण्याचा ठराव घेण्याची मागणी केली. यावेळी हरिभाऊ कांबळे, सुनील शिंदे, निवृत्ती कारखान्यास कांबळे, प्रकाश मोरूसकर, संजय देसाई, शांताराम पाटील यांनी विविध प्रश्न मांडले. संचालक मुकूंद देसाई यांनी स्वागत केले. यावेळी कारखान्याला जास्तीत जास्त ऊस पुरवठा करणाऱ्या सभासदांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी संचालक अशोक चराटी, विष्णुपंत केसरकर, वसंतराव धुरे, अंजना रेडेकर, मधुकर देसाई, दशरथ अमृते, राजेंद्र सावंत, जनार्दन टोपले, संभाजी पाटील, विजय पाटील, उदयराज पोवार, राजू होलम, अभिषेक शिंपी, मारुती मोरे, सभासद उपस्थित होते. एकनाथ गिलबिले यांनी सूत्रसंचालन केले. संचालक अनिल फडके यांनी आभार मानले.