कोल्हापूर : गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याने आगामी गळीत हंगाम, २०२४-२५ साठी ऊस तोडणी, वाहतुकीसाठी यंत्रणा उभारणीस प्रारंभ केला. यावेळी कारखान्याकडे आलेल्या पहिल्या अकरा कंत्राटदारांशी संचालिक रचना होलम व राजाराम होलम या उभयतांच्या हस्ते करार करण्यात आला. कारखान्याने आगामी गळीत हंगामात चार लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे, असे अध्यक्ष वसंतराव धुरे यांनी सांगितले.
कारखान्याचे अध्यक्ष धुरे म्हणाले की, कारखान्याने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तोडणी वाहतूक कंत्राटदारांचे करार करण्याचे काम सुरू केले आहे. आगामी गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने चालविण्याचे उद्दिष्ट संचालक मंडळाने ठेवून त्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी सुरू केली आहे. उपाध्यक्ष मधुकर देसाई, संचालक संभाजी पाटील, राजेश जोशिलकर, राजेंद्र मुरकुटे, दिपक देसाई, प्र. कार्यकारी संचालक व्यंकटेश ज्योती, मुख्य शेती अधिकारी युवराज पाटील, भुषण देसाई, संभाजी सावंत, शंकर आजगेकर आदी उपस्थित होते.