कोल्हापूर : आजरा साखर कारखाना पूर्ण क्षमतेने चालविला जाईल. यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन मशिनरीमध्ये फेरबदल केला आहे. कारखान्यातील हंगामी कर्मचाऱ्यांना ७ हजार व कायम कर्मचाऱ्यांना ९ हजार दिवाळीसाठी सानुग्रह अनुदान देणार आहे. कारखान्याचा एनसीडीसीकडील १५० कोटी कर्जाचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. यंदाच्या हंगामात ४ लाख मे. टन ऊस गाळप निश्चित करू, असा विश्वास कारखान्याचे अध्यक्ष वसंतराव धुरे यांनी व्यक्त केला. कारखान्याच्या २६ व्या बॉयलर अग्निप्रदीपन समारंभात ते बोलत होते. संचालक सुभाष देसाई व त्यांच्या पत्नी विजयालक्ष्मी यांच्या हस्ते होमहवन, तर अध्यक्ष वसंतराव धुरे, उपाध्यक्ष मधुकर देसाई यासह संचालकांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात आला.
मुकुंददादा देसाई यांनी सांगितले की, जनता बँकेच्या आर्थिक अडचणीच्या काळात कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे बँक ऊर्जितावस्थेत आणता आली. कारखान्यातील कामगारांनी सहकार्य केल्यामुळे कारखाना सुरू राहिला. तर कारखान्याला जिल्हा बँकेमार्फत कारखान्याला आर्थिक सहकार्य केले जाईल, असे जिल्हा बँक संचालक सुधीर देसाई यांनी सांगितले. संचालक काशिनाथ यांनी स्वागत केले. उद्योजक रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमास कार्यकारी संचालक व्यंकटेश ज्योती, सर्व संचालक, खाते प्रमुख, कर्मचारी व उपस्थित होते. रमेश देसाई यांनी सूत्रसंचालन केले. संचालक अनिल फडके यांनी आभार मानले.