परतूर : शहरातील मॉ बागेश्वरी साखर कारखान्याचे गाळप अंतिम टप्प्यात आले आहे. आतापर्यंत कारखान्याने ४ लाख ६५ हजार ३८५ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून एकूण ५ लाख २५ हजार ५०० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. तर साखरेचा उतारा ११.५४ आला आहे. बागेश्वरी कारखान्याने साखरेच्या उताऱ्यात मराठवाड्यात तिसरा क्रमांक मिळवला आहे. सद्यस्थितीत कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील फक्त ८० हेक्टर ऊस गाळपाचे क्षेत्र शिल्लक राहिले आहे.
परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील बळीराजा साखर कारखाना कानडखेड या कारखान्याने ११.८६ उतारा घेऊन मराठवाड्यात प्रथम क्रमांक पटकावला. लातूर जिल्ह्यातील विकास सहकारी साखर कारखाना तोंडारने ११.८३ उतारा घेऊन दुसरा क्रमांक पटकावला आहे. बागेश्वरी साखर कारखान्याचे गाळप अंतिम टप्प्यात आले आहे. कारखाना कार्यक्षेत्रात ६५६६ हेक्टर उसाची नोंद होती. आतापर्यंत ६३२१ हेक्टर क्षेत्रातील उसाची तोडणी झाली असून केवळ ८० हेक्टर ऊस शिल्लक राहिला आहे. त्यामुळे उसाचे गाळप अंतिम टप्प्यात आले आहे. शेतकऱ्यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून नवीन उसाची लागवड करावी, असे आवाहन कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव जाधव यांनी केले.