नवी दिल्ली : बजाज ऑटोने इंडिया मोबिलिटी एक्स्पो २०२४ मध्ये कंपनीच्या विविध मॉडेलचे प्रदर्शन केले. यामध्ये मुख्य वैशिष्ट्य पल्सर एनएस १६० (एनएस १६) आणि डोमिनार ई २७.५ ठरले. हे दोन्ही फ्लेक्स-इंधनाचे मॉडेल होते. बजाज ऑटोने या मोटारसायकल कधी लाँच हे स्पष्ट केले नसले तरी इथेनॉल-मिश्रित पेट्रोलवर चालणाऱ्या या दुचाकी गाड्यांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे.
पल्सर एनएस १६० फ्लेक्सची विशिष्ट इथेनॉल-मिश्रित पेट्रोल क्षमता उघड केलेली नाही. दुसरीकडे, डोमिनार ई२७.५ ला २७.५ टक्के इथेनॉल-पेट्रोल मिश्रणावर ऑपरेट करण्यासाठी इंजिनीयरिंग करण्यात आली आहे. हे तंत्रज्ञान ब्राझीलसह ३५ पेक्षा जास्त देशांमध्ये आधीच स्वीकारले गेले आहे. पल्सर एनएस १६० ची सध्या किंमत ₹१.३७ लाख आहे, तर डोमिनार ४०० ची एक्स-शोरूम किंमत ₹२.३० लाख आहे.
बजाज ऑटो लिमिटेडचे कार्यकारी संचालक राकेश शर्मा यांनी ग्राहक, धोरण निर्माते, विक्रेते आणि भागीदारांसह विविध भागधारकांना नाविन्यपूर्ण मोबिलिटी सोल्यूशन्स प्रदर्शित करण्याच्या भूमिकेवर जोर दिला. त्यांनी बजाज ऑटोचे केवळ पारंपारिक इंधन-आधारित पर्यायांसाठीच नव्हे तर सामाजिक उद्दिष्टांच्या अनुषंगाने स्वच्छ पर्यायी इंधनाप्रती असलेल्या समर्पणावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षमता ९० पेक्षा जास्त देशांमधील ग्राहकांपर्यंत पोहोचत असताना, बजाज ऑटो ऑटोमोटिव्ह उद्योगाच्या बदलत्या क्षेत्रानुसार विकसित होत आहे.