नवी दिल्ली : पर्यावरणाची हानी होऊ नये यासाठी भारतासह जगभरात पेट्रोल- डिझेलसारख्या पारंपरिक इंधनावर चालणाऱ्या वाहनांना पर्याय शोधला जात आहे. इलेक्ट्रिक गाड्या हा पर्याय असला तरी त्यांच्या किंमती खूप जास्त आहेत. त्यासाठी दुसरा पर्याय म्हणून इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांना प्राधान्य दिले जात आहे. बजाज कंपनीने अलीकडेच इथेनॉलवर चालणारी स्कूटर बनवण्याची घोषणा केली आहे.
आगामी काळात बजाजची इथेनॉल बाइक किंवा स्कूटर पाहायला मिळेल, असे बजाजकडून प्रसारमाध्यमांना सांगण्यात आले आहे. इथेनॉलवर चालणाऱ्या कारबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच माहिती दिली होती. दुसरीकडे बजाज इलेक्ट्रिक स्कूटर चेतकनंतर कंपनीला आता काहीतरी नवीन करायचे आहे. या नवीन योजनेअंतर्गत ते इथेनॉलवर चालणाऱ्या स्कूटर बनवू इच्छितात. इथेनॉल तंत्रज्ञानावर स्कूटर आणल्यास तिचे मायलेज १०० किलोमीटर प्रती लिटरपेक्षा जास्त असू शकते. भारतीय बाजारपेठेत ती कधी लॉन्च केला जाईल, याबाबत सध्या कोणतीही माहिती नाही.