कोल्हापूर : परीते-शाहूनगर येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब पाटील कौलवकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त कारखान्याच्यावतीने आयोजित कुस्ती मैदानात पहिल्या क्रमांकाच्या लढतीत महाराष्ट्र केसरी बाला रफिक याने गणेश जगताप (पुणे) याला अवघ्या २० मिनिटांत लपेट डावावर चितपट करत भोगावती साखर केसरीचा किताब पटकावला.
कारखान्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील व उपाध्यक्ष राजाराम कवडे यांच्या हस्ते दादासाहेब पाटील यांच्या प्रतिमेचे पुजन व आखाडा पूजन करण्यात आले. हिंद केसरी दिनानाथसिंह, विनोद चौगले, महाराष्ट्र केसरी विष्णू जोशिलकर, तालीम संघाचे नूतन पदाधिकारी संभाजी वरुटे, बाजीराव कळंत्रे, पी. जी. मेढे, सागर चौगले, आनंदा खराडे यांचा सत्कार करण्यात आला.
भोगावती कामगार केसरीचा किताब श्रीमंत भोसले (इचलकरंजी) याने व तिसऱ्या क्रमांकाचा भोगावती वाहतूक केसरीचा किताब बाबा रानगे (मोतीबाग तालीम) याने पटकावला. मैदानात १७० हून अधिक चटकदार कुस्त्या झाल्या. दादासाहेब पाटील ट्रस्टतर्फे ईश्वरा पाटील (गुडाळ) व सदाशिव रामाणे (माजगाव) यांना गुणवंत कामगार पुरस्कार देण्यात आला. यावेळी संचालक कृष्णराव किरुळकर, क्रांतीसिंह पवार-पाटील, रंगराव कळंत्रे, पांडूरंग पाटील, धैर्यशिल पाटील-कौलवकर, प्रभारी कार्यकारी संचालक संजय पाटील, ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. निवास पाटील, शिवाजीराव पाटील-कौलवकर, जनसंपर्क अधिकारी राजेंद्र पाटील, एच. आर. मॅनेजर विजय पाटील युनियनचे उपाध्यक्ष सुरेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.