परभणी : पूर्णा तालुक्यात शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बळीराजा साखर कारखान्याची उभारणी करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन श्री. शिवाजीराव जाधव यांनी दिली. ते म्हणाले, बळीराजा साखर कारखान्याने उसाला उच्चांकी २७६४ रुपये दर दिला असून यापुढेही कारखाना शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्यरत राहील.
जाधव म्हणाले, कारखाना दरवर्षीप्रमाणे मोळी पूजनाच्या कार्यक्रमात दर जाहीर करत होता, पण शासनाच्या धोरणाप्रमाणे आर्थिक वर्ष संपल्यानंतर सरासरी साखर उतारा आणि ताळेबंद पत्रक अंतिम झाल्यानंतर दर जाहीर करावा लागणार आहे. २०२३-२४ गाळप हंगामासाठी एफआरपीप्रमाणे २७६४ रुपये प्रति टन अंतिम भाव शेतकऱ्यांच्या उसाला देणार असल्याची माहिती जाधव यांनी दिली आहे. आतापर्यंत २३०० रुपये दिल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, २०२३- २०२४ गाळप हंगामासाठी ७१६० हेक्टर उसाची नोंद झाली आहे. नोंद झालेल्या सर्व उसाचे गाळप मार्चपूर्वी करण्यात येणार आहे. तरी परिसरातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस गाळपासाठी पाठवावा, असे आवाहनही त्यांनी केले. २७ जुलै रोजी कारखान्याचे रोलर पूजन संचालक दिनकरराव जाधव यांच्या हस्ते झाले.