कोल्हापूर : महाराष्ट्रात सध्या उसाचा गाळप हंगाम सुरू आहे. अशातच, केंद्र सरकारने उसापासून इथेनॉल निर्मितीवर बंदीचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे साखर कारखान्यांसमोर आर्थिक संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह साखर कारखानदारही धास्तावले आहेत. उसापासून इथेनॉल निर्मितीवर बंदीने कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात २०० कोटींचे उत्पन्न घटणार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याप्रश्नी गरज भासल्यास दिल्लीला शिष्टमंडळ नेवून चर्चेने मार्ग काढला जाईल, असे सांगितले आहे. देशाची वार्षिक साखरेची गरज २८० लाख टन साखरेची आहे. तर सध्या ५ लाख टन साखर शिल्लक आहे. यंदाचे साखरेचे अपेक्षित उत्पादन २८० ते २९० लाख टन आहे. उसापासून इथेनॉल उत्पादन बंदीमुळे कारखान्यांना मोठे नुकसान सोसावे लागेल. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील कारखान्यांकडून २० कोटी लिटर इथेनॉल उत्पादन यामुळे थांबणार आहे. कारखान्यांच्या उत्पन्नात सुमारे २०० कोटींची घट होईल.
साखर उद्योगाचे अभ्यासक विजय औताडे यांनी सांगितले की, साखर दरवाढीची भीती, ग्राहकांना वाजवी भावात साखर मिळावी यासाठी केंद्राने हे पाऊल उचलले. मात्र, यात उद्योगाचा विचार झालेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार जयंत पाटील, माजी खासदार राजू शेट्टी यांनी या निर्णयाबाबत केंद्र सरकारवर टीका केली.