पुणे : देशाच्या साखर उत्पादनात काहीशी तुट येण्याची शक्यता असल्यामुळे केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीवर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे साखर कारखाने अडचणीत आले आहेत. केंद्र सरकारला याची जाणीव आहे. निर्बंध तात्पुरते आहेत. लवकरच यातून दिलासा मिळेल, असे संकेत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले.
वसंतदादा शुगर इंन्स्टिट्यूटने (व्हीएसआय) आयोजित केलेल्या जागतिक साखर उद्योगातील शाश्वतता, आव्हाने आणि संधी, या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये ते बोलत होते. गडकरी यांच्या हस्ते या तीन दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. ‘चीनीमंडी’ या जागतिक परिषदेचा मिडिया पार्टनर आहे.
मंत्री गडकरी म्हणाले, इथेनॉलप्रश्नी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संपर्कात आहे. दीर्घकालीन इथेनॉल धोरणानुसार केंद्र सरकारचे इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन कायम आहे. लवकरच निर्बंधाबाबत दिलासा मिळेल. मात्र, कारखान्यांनी फक्त इथेनॉल उत्पादनावर थांबू नये. कॉम्प्रेस्ड बायोगॅस (सीबीजी), हरीत हायड्रोजन आणि हरित विमान इंधन उत्पादनाच्या दिशेने गेले पाहिजे.
मंत्री गडकरी म्हणाले की, पानिपतमध्ये भाताच्या पेंड्यापासून (भाताचे उर्वरीत अवशेष) कॉम्प्रेस्ड बायोगॅस आणि हरीत विमान इंधन उत्पादनात यश आले आहे. कारखान्यांनी कारखान्यांनी कचरा, सांडपाणी, मळीसह सर्व कृषी कचरा, शहरी कचऱ्यापासून इथेनॉलसह सीबीजी, हरित हायड्रोजन आणि विमान इंधन निर्मिती करण्याकडे वळावे. देशात फक्त इथेनॉलचे ३०० पंप सुरू करण्यास परवानगी दिली आहे. साखर कारखान्यांना पेट्रोल-डिझेल पंपाच्या बरोबरीने इथेनॉल पंप सुरू करता येतील, असेही गडकरी म्हणाले.