भारताने तांदूळ निर्यातीबाबत कठोर निर्णय घेतला आहे. सरकारने बासमती तांदूळ वगळता इतर सर्व प्रकारच्या कच्च्या तांदळाच्या निर्यातीवर निर्बंध लागू केले आहेत. आगामी सणासुदीच्या काळात देशांतर्गत बाजारपेठेतील वाढती मागणी आणि किरकोळ किमतीवर नियंत्रण आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
अन्न मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बासमती तांदूळ आणि सर्व प्रकारच्या उसना तांदळाच्या निर्यात धोरणात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. म्हणजेच केवळ बिगर बासमती कच्च्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. भारतातून बासमती तांदळाची निर्यात मोठ्या प्रमाणावर होते. सरकारने गैर बासमती सफेद तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालून देशांतर्गत बाजारातील किमतीवर नियंत्रण मिळविण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या काही दिवसात तांदळाच्या दराने १० ते २० टक्के उसळी घेतल्याचे आजतकच्या वृत्तात म्हटले आहे. दरम्यान, काही अटींवर तांदूळ निर्यातीस परवानगी दिली जावू शकते. जर अधिसूचना जारी होण्यापूर्वी जहाजांवर तांदळाचे लोडिंग सुरू असेल तर त्याच्या निर्यातीची परवानगी असेल. याशिवाय, जेथे सरकारने इतर देशांना परवानगी दिली आहे, अशा ठिकाणी तांदूळ निर्यातीची परवानगी कायम राहिल. सद्यस्थितीत देशातून निर्यात होणाऱ्या गैर बासमती तांदळात सफेद तांदळाचा हिस्सा २५ टक्के आहे. भारताने २०२२-२३ मध्ये ४.२ मिलियन अमेरिकन डॉलर मूल्याची सफेद तांदळाची निर्यात केली होती. तर आधीच्या वर्षात ही निर्यात २.६२ मिलियन अमेरिकन डॉलरची होती. भारत थायलंड, इटली, स्पेन, श्रीलंका आणि अमेरिकेला सर्वाधिक तांदूळ निर्यात करतो.