काही दिवसांपूर्वी इराणने भारतीय चहा आणि तांदळाच्या आयातीवर अचानक बंदी घातली. याबाबत केंद्र सरकारने आश्चर्य व्यक्त केले आहे. इराणच्या खरेदीदारांनी भारताकडून तांदूळ आणि चहाची खरेदी का बंद केली, याचे स्पष्टीकरण भारताने इराणच्या राजदूतांना विचारले आहे. दरम्यान, या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. बिझनेस स्टँडर्डमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार भारत सरकारने इराणची राजधानी तेहरानमधील राजदूताला इराणच्या खरेदीदारांनी भारतातून तांदूळ आणि चहाची आयात का बंद केली आहे याची माहिती देण्यास सांगितले आहे. एका उच्च सरकारी अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. मिंट या बिझनेस वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या आठवड्यात दोन सरकारी अधिकाऱ्यांनी नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले की, भारताने इराणमधून काही फळांच्या आयातीवर बंदी घातल्यानंतर ही प्रक्रिया घडली आहे.
आज तकमधील वृत्तानुसार, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, वाणिज्य विभागाने कृषी मंत्रालयाला तसेच इराणची राजधानी तेहरानमधील राजदुतांना याविषयी भारताला कळवण्यास सांगितले आहे. भारतीय तांदूळ आणि चहाची खरेदी इराणी खरेदीदारांनी का थांबवली? अशी विचारणा केली आहे. इराणमध्ये भारतीय चहाला मोठी मागणी आहे. त्यामुळे ही चिंतेची बाब असल्याचे भारतीय निर्यातदारांनी म्हटले आहे. भारत इराणला उच्च दर्जाचा चहा मोठ्या प्रमाणात निर्यात करत आहे. इराणच्या बाजारपेठेत भारतीय चहाला मोठी मागणी आहे असे सांगून इंडियन टी असोसिएशनचे सचिव सुजित पात्रा म्हणाले की, आम्ही हा विषय वाणिज्य मंत्रालय, विदेशी व्यापार महासंचालनालय आणि तेहरानमधील भारतीय दूतावासासमोर मांडला आहे. इराणने चहा आणि तांदळाची आयात का बंद केली हे समजून घ्यायचे आहे. परकीय व्यापाराच्या दृष्टीने इराण हा भारतासाठी महत्त्वाचा देश मानला जातो. भारत आपल्या चहाच्या निर्यातीपैकी एक पंचमांश इराणला विकतो. तांदूळ निर्यातीच्या दृष्टीने इराण ही भारतासाठी मोठी बाजारपेठ आहे. गेल्या आर्थिक वर्षात भारतातून एकूण निर्यातीपैकी एक चतुर्थांश तांदूळ इराणला विकला गेला आहे.