भारत सरकारने गेल्या काही दिवसांपासून गैर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यानंतर अमेरिकेतील डिपार्टमेंटल स्टोअर्समधून तांदूळ खरेदीसाठी धावाधाव सुरू झाल्याचे दिसून येत आहे. तांदूळ खरेदीसाठी गर्दी होत असल्याने दुकानदारांकडून ग्राहकांना तांदळाच्या किती बॅग द्यायच्या यावर नियंत्रण आणण्यात आले आहे. काही स्टोअर्सनी एका कुटुंबाला केवळ एकच तांदूळ बॅग मिळेल असे फलक लावले आहेत. मात्र, तांदळाच्या साठेबाजीने नवी चिंता निर्माण झाली आहे.
आजतकमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, लोकांकडून तांदूळ खरेदी करून जादा किमतीला ऑनलाइन विक्री केली जाईल अशी धास्ती आहे. भारताना गैर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी आणल्यानंतर जागतिक स्तरावर प्रवासी भारतीयांवर याचा परिणाम झाला आहे. अनेक एनआरआयनी कथितरित्या १० ते १५ बॅग सोना मसुरी तांदूळ खरेदी केला आहे. भारताने केलेल्या निर्यात बंदीनंतर अनेक एनआरआयनी ट्विटरच्या माध्यमातून तेथील चित्र दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान, तांदूळ निर्यातदार डेक्कन ग्रेन्स इंडियाचे संचालक किरण कुमार पोला यांनी सांगितले की, अमेरिकेत तांदूळ उपलब्धतेबाबत एनआरआयनी चिंता करण्याची गरज नाही. अमेरिकेकडे पुरेसा साठा आहे आणि किमान सहा महिने हा तांदूळ पुरेल. दरम्यान, अमेरिकेत भारतातून निर्यात होणाऱ्या तांदळाचा खप अधिक आहे. काही ठिकाणी आता तांदूळ दुप्पट किमतीला विक्री केला जाऊ लागला आहे. ९.०७ किलो तांदळाची बॅग आधी १६ ते १८ डॉलरला मिळत होती. आता काही ठिकाणी त्याची किंमत ५० डॉलरपर्यंत आहे.