धाराशिव : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने बुधवारी (दि. २८) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बँडबाजा लावून आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडील थकीत एफआरपीची रक्कम तत्काळ शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. जिल्ह्यातील ८ साखर कारखान्यांकडे एफआरपीचे ९० कोटी रुपये थकीत आहेत. साखर कारखान्यांकडील थकीत एफआरपीची रक्कम दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने पैसे देण्यात यावेत अशी मागणी आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
‘स्वाभिमानी’ने निवेदनातून दिलेल्या माहितीनुसार, साखर सहसंचालकांकडील आकडेवारीनुसार १५ फेब्रुवारीअखेर धाराशिव जिल्ह्यातील मुरुम येथील विठ्ठलसाई साखर कारखान्याकडे २८.२९ कोटी, भैरवनाथ (सोनारी) २०.६४ कोटी, लोकमंगल माऊली १३.४६ कोटी, भैरवनाथ ( तेरणा) १८.४० कोटी, गोकुळ शुगर १२.५४ कोटी, भैरवनाथ (शिवशक्ती) ६.०७ कोटी, क्युएनर्जी ०.४३ कोटी, भीमाशंकर ०.१० कोटी अशी एकुण ९० कोटी रुपये एफआरपीची रक्कम थकीत आहे. ही रक्कम तातडीने देण्याची मागणी करण्यात आली. स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष धनाजी पेंदे, जिल्हा संपर्क प्रमुख शहाजी सोमवंशी, तालुकाध्यक्ष दुर्वास भोजने, अजय साळुंखे, विजय शिरसाठ, गणेश कावरे, सतीश डाके आदींसह शेतकरी उपस्थित होते.