ढाका: बांगलादेशमधील साखर कारखान्यांना या वर्षी सर्वात कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला आहे. गेल्या पाच दशकांमध्ये साखर उत्पादनात सर्वात मोठी घट साखर उताऱ्यात झाली आहे. देशभरात जवळपास सात लाख टन उसाचे गाळप झाले असून ३८४२२ टन साखर उत्पादन झाले आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षात आतापर्यंत साखर उतारा ५.५७ टक्के इतकाच झाला आहे.
बांगलादेश साखर आणि अन्नधान्य उद्योग निगमचे प्रमुख अब्दूल लतीफ यांनी सांगितले की, पीक आणि गाळपातील उशीरामुळे साखर उतारा घटला आहे. उत्पादन घटण्यास हेच घटक मुख्य कारणीभूत आहेत. साखर उत्पादनाचा संबंध उसाची तोडणी आणि गाळपाशी जोडला जातो. डिसेंबर २०२०च्या सुरुवातीला ऊसाचे गाळप रोखणाऱ्या सरकारच्या अधिपत्याखालील १५ पैकी ६ साखर कारखान्यांच्या खात्यांमध्ये अडचणी निर्माण झाल्या होत्या. उसाची तोडणी दररोजच्या गाळप क्षमतेवर आधारित केली जाते. त्यामुळे चांगले उत्पादन मिळविण्यासाठी त्याचे नियोजन योग्य करणे गरजेचे आहे. तोडणीत जर गोंधळ झाला तर त्याचा फटका साखरेच्या उताऱ्याला बसतो. सद्यस्थितीत साखरेचा उतारा पाहता साखरेचे उत्पादन जवळपास ४९००० टनापर्यंत पोहोचू शकते. बांगलादेशने साखरेच्या उत्पादनाचे लक्ष्य १.१५ लाख टन इतके निश्चित केले होते. त्यापेक्षा खूप कमी उत्पादन होणार आहे.