बांगलादेश: ईदच्या अगोदर साखरेची आणखी दरवाढ करण्याची रिफायनर्सची मागणी

ढाका : सध्या बांगलादेशच्या बाजारपेठांमध्ये साखरेचा तुटवडा जाणवत असल्यामुळे विक्रेते सरकारने ठरवून दिलेल्या किमतीपेक्षा जादा दराने साखर विक्री करत आहे. त्यामुळे देशातील सर्वसामान्य ग्राहक हैराण झाले आहेत. तरीही ईदच्या अगोदर साखरेच्या किरकोळ विक्री दरात आणखी प्रती किलो Tk २० (रुपये) वाढ करण्याची मागणी शुगर रिफायनर्सनी संबंधीत विभागाकडे केली आहे.

साखरेचा आयात खर्च वाढल्याने ईदच्या अगोदर पॅकेज्ड साखर विक्री दर प्रती किलो १५० Tk करावा आणि खुल्या साखरेचा दर १४० Tk प्रती किलो करावा, अशी मागणी रिफायनर्सनी सरकारकडे केली आहे. यापूर्वी बांगलादेश शुगर रिफायनर्स असोसिएशन (बीएसआरए) ने बांगलादेश व्यापार आणि शुल्क आयोगाकडे साखरेच्या दरात वाढ करण्याची मागणी केली होती. त्यानंतर वाणिज्य मंत्रालयाने पॅकेज्ड साखरेचा दर १२५ Tk प्रती किलो आणि खुल्या साखरेचा दर १२० Tk प्रती किलो केले होते. मात्र, २२ जूनपासून वाढीव दराने साखर विक्री करण्यास अनुमती देण्याची मागणी रिफायनर्सनी केली आहे.

बिझनेस पोस्टमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, सध्या बाजारात पॅकेज्ड साखर प्रती किलो १४०-१४५ Tk आणि खुली साखर १३५ Tk प्रती किलो या दराने विक्री केली जात आहे. मजबूत बनलेला डॉलर आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील दरातील तेजी यामुळे साखर आयात खर्च वाढल्याचा दावा रिफायनर्सकडून केला जात आहे. याबाबत देशातील प्रमुख साखर रिफायनर्सपैकी एक असलेल्या मेघना ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज (एमजीआय) चे डेप्युटी जनरल मॅनेजर तस्लीम शहरयार म्हणाले की, परदेशातून कच्ची आणि शुद्ध साखर आयात करण्यासाठीची सवलत संपुष्टात आल्याने आयात खर्च वाढला आहे. आयातदारांना प्रती किलो Tk ३१ ऐवजी प्रती किलो ४० Tk शुल्क व कर भरावा लागत आहे. सोमवारी ढाक्यामध्ये Tk १२० ते १४० प्रती किलो दराने साखरेची किरकोळ विक्री सुरू होती.

दरम्यान, वाणिज्य सचिव तपन कांती घोष यांनी सांगितले की, शुगर रिफायनर्स असोसिएशनने दरवाढीचा प्रस्ताव आयोगाकडे पाठवला आहे. पॅकेज्ड आणि नॉन पॅकेज्ड साखरेच्या दरात वाढ करण्याची मागणी केली आहे. जागतिक बाजार अस्थिर असताना बाजारपेठेतील किमती स्थिर ठेवणे ही कठीण बाब आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेच्या दरवाढीमुळे बांगलादेशातील कारखानदारांसाठी गेल्या महिन्यात विक्री दरात वाढ केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here