ढाका/नवी दिल्ली : भारत-बांगलादेश या दोन्ही देशांसाठी व्यापक आर्थिक भागिदारी करार (CEPA) फायदेशीर ठरेल, असे भारत-बांगलादेश चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिज (IBCCI)चे अध्यक्ष अब्दुल मतलुब अहमद यांनी म्हटले आहे. याबाबत बांगलादेशातील प्रसार माध्यमांनी वृत्त दिले आहे.
गेल्या वर्षी २६ ते २७ मार्च या कालावधीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशच्या राजकीय दौऱ्यावेळी दोन्ही घटकांनी CEPA मध्ये प्रवेश करण्याच्या शक्यतेवर चर्चा केली होती. दोन्ही देशांदरम्यान व्यापार वाढविण्यासाठी दोन्ही पंतप्रधानांनी नॉन टेरिफ अडथळे दूर करण्याच्या गरजेवर भर दिला होता.
अध्यक्ष मतलुब यांनी म्हटले आहे की, बांगलादेशला गहू, साखर, कापूस आणि कांदा अशा जीवनावश्यक वस्तूंच्या तुटवड्याचा सामना करावा लागल्यास तत्काळ पुरवठ्यासाठी भारताशी चर्चा केली पाहिजे. ते म्हणाले की, व्यापक आर्थिक भागिदारी (CEPA) करारातून व्यापाराला आणखी प्रोत्साहन मिळण्यास मदत होईल. भारत आणि बांगलादेश CEPA वर हस्ताक्षर करण्यासाठी आवश्यक चर्चा सुरू करू इच्छितात. या आठवड्यात पंतप्रधान शेख हसीना यांच्या नवी दिल्लीच्या राजकीय दौऱ्यावेळी या मुद्यांवर आणखी चर्चा केली जाईल. या दौऱ्यावेळी पंतप्रधानांसोबत बांगलादेशातील व्यापारी संघटनांचे प्रतिनिधीही सहभागी असतील.