ढाका : बांगलादेशच्या साखर आणि अन्न उद्योग महामंडळाने या हंगामात ४८ हजार ५५ टन साखरेच्या उत्पादनाबरोबरच गाळप संपुष्टात आणले आहे. या हंगामात १९७३ नंतर ४८ वर्षांतील सर्वात कमी साखरेचे उत्पादन झाले आहे. एवढेच नव्हे तर साखरेचा उतारा ५.४९ टक्के नोंदवला गेला आहे.
बीएसएफचे चेअरमन आरिफुर रहमान अपू यांनी सांगितले की, सरकारी साखर कारखाने अचानक बंद झाल्याने उसाची तोडणी, गाळप यावर परिणाम झाला आहे. नऊ सरकारी साखर कारखाने गाळप हंगामापूर्वी सुमारे एक महिना आधी सुरू झाले होते. सरकारने १००० कोटींच्या वार्षिक नुकसानीची आकडेवारी मांडत गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात सहा साखर कारखाने बंद केले.
चालू हंगामात एकूण ८,७५,७७९ टन उसाचे गाळप झाले आहे. आणि २०२०-२१ साठी गेल्यावर्षीच्या १६.४३ लाख टन उत्पादनाच्या तुलनेत निम्मे उत्पादन झाले आहे. साखरेच्या उत्पादनाचे उद्दीष्ट १.१५ लाख टन होते. गेल्यावर्षी २०१९-२० मध्ये १५ सरकारी साखर कारखान्यांचा उतारा ५.८८ टक्के होता. कारखान्यांनी १३,७६,३९६ टन ऊस गाळप करून ८०,७४७ टन साखर उत्पादन केले आहे. यंदा तिसऱ्यांदा ५०,००० टनापेक्षा कमी उत्पादन झाले आहे.