ढाका : आधीच महाग असलेल्या साखरेच्या दरात १५ टका (Tk) प्रती किलो वाढ करण्याचा प्रस्ताव बांग्लादेश व्यापार आणि टेरिफ आयोगाने दिला आहे. प्रसार माध्यमातील वृत्तानुसार, टेरिफ कमिशनने अलिकडेच बँकांच्या कर्ज दरातील बदल, डॉलरचे वाढते मूल्य आणि रिफायनर्सच्या उत्पादन खर्चाचे कारण देत, साखर रिफायनर्सची दरवाढीच्या मागणी अर्जावर उत्तर देताना वाणिज्य विभागाला आपला प्रस्ताव पाठवला आहे.
टेरिफ कमिशनने पॅक्ड साखरेच्या किरकोळ विक्री किमतीवर (एमआरपी) सध्याचा दर Tk१२५ पासून वाढवून Tk१४० प्रती किलो करण्याची शिफारस केली आहे. तर खुल्या साखरेची किंमत एमआरपी Tk१२० प्रती किलोवरुन वाढवून Tk१३५ करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यामुळे रिफाइंड लूज आणि पॅकेज्ड साखरेची मिल गेट किंमत अनुक्रमे Tk१३० रुपये प्रती किलो आणि Tk१३५ प्रती किलो प्रस्तावित आहे. याशिवाय रिफाइंड लूज आणि पॅकेज्ड साखरेचे दर प्रती किलो Tk१३२ आणि वितरक स्तरावर Tk १३७ असेल.
वाणिज्य मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्हाला टेरिफ आयोगाकडून साखरेच्या किमतींदर्भात पत्र मिळाले आहे. मात्र, आम्ही अद्याप यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. ८ मे रोजी सरकारने खुली आणि पॅकेज्ड साखरेच्या दराचा आढावा घेतला होता आणि आयोगाच्या शिफारसीनुसार हा दर अनुक्रमे Tk १२० आणि Tk १२५ प्रती किलो निश्चित केला आहे.
ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ बांगलादेश (टीसीबी) च्या दैनिक बाजार मूल्यानुसार ढाका शहरात विविध ठिकाणी साखरेचा दर Tk १३०-१४० प्रती किलो आहे. सध्या साखर दुर्मिळ आणि महाग झाली आहे. सरकारने अनेक उपाय योजना करूनही साखरेचे दर नियंत्रणात आलेले नाहीत. राज्य सरकार साखरेसह विविध वस्तूंच्या किमती स्थिर व्हाव्यात यासाठी आवश्यक पावले उचलण्यासाठी व्यापाऱ्यांसोबत नेहमीच बैठक घेते असे काही सूत्रांनी सांगितले.