बांगलादेशमध्ये सीमेवर सन २०२४ मध्ये ७० लाख किलो साखर जप्त: अहवाल

ढाका : बांगलादेशातील विविध प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, बॉर्डर गार्ड बांगलादेश (बीजीबी) ने एक जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत देशाच्या सीमावर्ती भागात आणि इतर ठिकाणी छापे टाकून २,१८४ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध तस्करीच्या वस्तू जप्त केल्या आहेत.

जप्त केलेल्या या वस्तूंमध्ये साखर, सोने, चांदी, साड्या, सौंदर्यप्रसाधने, कांदा, लसूण, जिरे, मासे, सुपारी, लाकूड, दगड, कोळसा, नकली दागिने, दगडी मूर्ती, सापाचे विष, विडी आणि सिगारेट, खते, डिझेल, पेट्रोल, ऑक्टेन, मोबाईल फोन, मोबाईल डिस्प्ले, ग्लास, चॉकलेट, बिस्किटे, कीटकनाशके, कासवांची हाडे, फटाके, ट्रक, कव्हर व्हॅन, बस, कार, मायक्रोबस, पिकअप, सीएनजी, इझी बाईक, मोटारसायकल आणि सायकली आदींचा समावेश आहे.

बीजीबीने दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या वस्तूंमध्ये ७० लाख १५ हजार ८२४ किलो साखरेचाही समावेश आहे, असे द बिझनेस स्टँडर्डच्या वृत्तामध्ये म्हटले आहे. २०२४ मध्ये बांगलादेशच्या देशांतर्गत बाजारपेठेत साखरेची किंमत वाढत गेली. त्यामुळे साखर तस्करीत वाढ झाली. बीजीबीकडून अशा तस्करीवर आळा घातला जात आहे.

स्थानिक न्यूज पोर्टल Bonikbarta.net ने सप्टेंबर २०२४ मध्ये वृत्त दिले होते की बेकायदेशीरपणे आयात केलेली बहुतेक साखर सिल्हेट आणि फेनी या सीमावर्ती भागातून येते. बांगलादेशात साखरेच्या किमती वाढल्यामुळे, बेकायदेशीर आयातीचा ट्रेंड वाढला आहे. तस्कर अनेकदा वाळू किंवा भुशाच्या ओझ्याखाली साखर लपवतात. स्थानिक प्रभावशाली व्यक्ती आणि काही अधिकाऱ्यांच्या मदतीने ही साखर कस्टम ड्युटी न भरता देशभर वितरित केली जाते. सीमेवर जप्त केलेल्या साखरेपेक्षा कितीतरी पट जास्त साखर देशांतर्गत बाजारात आली आहे, असा अधिकाऱ्यांना संशय आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here