नवी दिल्ली : बँकांच्या कामकाजाच्या वेळा लवकरच बदलण्याची शक्यता असून यापुढे बँका आठवड्यातून केवळ पाच दिवस सुरू राहणार आहेत. यामुळे बँक कर्मचार्यांचा आठवडा आता पाच दिवसांचा असेल. एका वरिष्ठ अधिकार्याच्या माहितीनुसार, नोव्हेंबरच्या दुसर्या आठवड्यात बँक संघटनांसमवेत आयबीएची एक बैठक होणार आहे. लवकरच बैठकीची तारीख घोषित करण्यात येईल. या बैठकीत बँक कर्मचार्यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर नोव्हेंबरच्या अखेरीपर्यंत पाच दिवसांचा आठवडा आणि फॅमिली पेन्शन, वेतनवाढ आदींबाबत घोषणा करण्यात येईल. दर शनिवार आणि रविवारी बँका बंद असतील. सध्या दर रविवार आणि दुसरा-चौथ्या शनिवारी बँका बंद असतात. याशिवाय बँक कर्मचार्यांच्या ’फॅमिली पेन्शन’ मध्येही वाढ होईल, तसेच पगारात 15 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
अधिकार्यांच्या माहितीनुसार, 18 ऑक्टोबरला झालेल्या बैठकीत अनेक मुद्द्यांवर सहमती दर्शवण्यात आली. काही तांत्रिक बाबी आहेत, त्या अर्थ मंत्रालयाकडून स्पष्ट करणे गरजेच्या आहेत. अर्थ मंत्रालयाने बँक कर्मचार्यांच्या प्रश्नांवर आपली भूमिका स्पष्ट करावी त्यानंतर सहमतीवर दोघांकडून स्वाक्षरी करण्यात येईल, हा मुद्दाही बैठकीत मान्य करण्यात आला. बँक कर्मचार्याच्या मागण्या सरकारने लवकरात लवकर मान्य कराव्यात अशी आमची अपेक्षा आहे. आमच्या मागण्या 2017 पासून प्रलंबित आहेत. त्यावर लवकरच निर्णय होईल अशी अपेक्षा आहे, असे ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कन्फेडरेशन जनरल सेक्रेटरी सौम्या दत्ता यांनी सांगितले.
सूत्रांच्या माहितीनुसार, अर्थ मंत्रालयाने बँक कर्मचार्यांच्या बहुतांश मागण्या मान्य करण्याचे मान्य केले आहे. महिनाभरात बँक कर्मचार्यांच्या मागण्यांसदर्भात आमच्याशी चर्चा करून हे प्रश्न मार्गी लावावेत, असे निर्देशही मंत्रालयाने इंडियन बँक्स असोसिएशनला (आयबीए) दिले आहेत.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.