राष्ट्रीय कंपनी लॉ अपिलिय ट्रिब्युनलने (NCLAT) कर्जबुडव्या फ्युचर रिटेल लिमिटेड कंपनीविरुद्ध दिवाळखोरी प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम मुदत सुमारे एक महिन्याने वाढवली आहे. आता या प्रक्रियेसाठी १७ ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. कंपनीने गुरुवारी स्टॉक एक्सचेंज फायलिंगमध्ये ही माहिती दिली.
आजतकमधील वृत्तानुसार, नियामक फायलिंगमध्ये, कंपनीने सांगितले आहे की, एनसीएलटीच्या मुंबई खंडपीठाने फ्युचर रिटेल लिमिटेडला कॉर्पोरेट दिवाळखोरी रिझोल्यूशन प्रक्रियेमधून ३३ दिवसांच्या कालावधीसाठी बाहेर ठेवण्याची परवानगी दिली आहे. फ्युचर रिटेलने सांगितले की, एनसीएलटीने १७ जुलै रोजी कंपनीच्या अर्जावर सुनावणी घेतली आणि सीआयआरपीसाठी अतिरिक्त सूट देण्याचा निर्णय घेतला. कर्ज फेडण्यात अपशयी ठरलेल्या या कंपनीविरोधात २० जुलै २०२२ रोजी एनसीएलटीने कॉरपोरेट दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू केली होती. यापूर्वी कंपनीला ९० दिवसांची सवलत देण्यात आली होती.