राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज पुणे येथील राष्ट्रीय बँक व्यवस्थापन संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी समारंभानिमित्त उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी कोविंद यांनी संस्थेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त उपस्थितांचे अभिनंदन केले. यावेळी बोलतांना कोविंद म्हणाले की, एनआयबीएमची स्थापना झाल्यापासून 1.1 लाखापेक्षा जास्त बँकर्सना येथे प्रशिक्षण देण्यात आले आहे. एनआयबीएम कॅम्पसमध्ये सुमारे 9,000 आंतरराष्ट्रीय विद्यार्थी प्रशिक्षण घेऊन गेले आहेत. अशा प्रकारे परदेशात भारताची ‘सॉफ्ट पॉवर’ उभारण्यात या संस्थेने मोठे योगदान दिले आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियामक व्यवस्थेनेही बँकिंग कार्यात अधिक स्थिरता आणली असल्याचे सांगताना कोविंद म्हणाले की, नियामक म्हणून अलीकडेच भारतीय रिझर्व बँकेची भूमिका वाढली आहे. आम्हाला विश्वास आहे की यामुळे बँकांच्या गैरप्रकारांना आळा बसेल आणि आपल्या आर्थिक प्रणाली अधिक विश्वासार्ह बनतील. गरीब आणि गरजू लोकांच्या खात्यात विविध कल्याणकारी योजनांतर्गत थेट निधी हस्तांतरित करून कोट्यवधी लोकांचे जीवन उजळले आहे. या निधीची रक्कम सुमारे 9.2 लाख कोटी रुपये इतकी आहे.
आगामी काळात भारतीची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे ध्येय निश्चित केले असल्याचे सांगताना राष्ट्रपती कोविंद म्हणाले की, बँकिंग क्षेत्राला आगामी काळात मोठी झेप घेण्याची तयारी करावी लागणार असून यामध्ये ज्या क्षेत्रामध्ये बँक नाही, तिथे ‘बँकिंग’ पोहाचवले पाहिजे आणि असुरक्षित क्षेत्रामध्ये आर्थिक सुरक्षा निर्माण केली पाहिजे. यासाठी ‘एनआयबीएम’ने प्रशिक्षित मनुष्य बळ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी स्वीकारावी. विशेष म्हणजे जागतिक दर्जाचा विचार करून त्या दर्जाची बँकिंग सेवा देतील असा कुशल, प्रशिक्षित वर्ग बँकिंग संस्थांना उपलब्ध करून द्यावा.
कोविंद पुढे म्हणा8ले की, बँकांमधल्या ठेवींवर असलेल्या विमा संरक्षणामध्ये 1 लाख रूपयांवरून 5 लाख रुपयांपर्यंत वाढ करण्याचा प्रस्ताव अलिकडेच आणण्यात आला आहे. हा प्रस्ताव म्हणजे बचतकर्त्यांसाठी एक सकारात्मक पाऊल आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.