पुणे : जिल्ह्यात चालू वर्ष २०२३-२४ मध्ये बारामती ॲग्रो या खासगी कारखान्याने १९.५६ लाख टन इतके सर्वाधिक ऊस गाळप आणि ९.०४ टक्के सरासरी उताऱ्यानुसार १७.७३ लाख क्विंटल इतके सर्वाधिक साखर उत्पादन करत अव्वल स्थान कायम राखले आहे. जिल्ह्यातील १४ कारखान्यांकडून आतापर्यंत १ कोटी ११ लाख ४५ हजार १८५ टन उसाचे गाळप पूर्ण झाले आहे. तर १०.०३ टक्के सरासरी उताऱ्यानुसार १ कोटी १४ लाख ७६ हजार ७४५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.
यंदा जिल्ह्यात मार्च महिनाअखेरपर्यंत कारखाने सुरू राहण्याचा अंदाज आहे. जिल्ह्यातील दौंड शुगर या खासगी कारखान्याने १६.१२ लाख टन ऊसगाळप आणि ९.६८ टक्के सरासरी उताऱ्यानुसार १५.४२ लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने १०.८४ लाख टन ऊस गाळप आणि जिल्ह्यात ११.६८ टक्के इतका सर्वाधिक साखर उतारा घेत १२.६७ लाख क्विंटल साखर उत्पादन तयार केले आहे. त्यानंतर माळेगाव सहकारीने १०.४८ लाख टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. दरम्यान, जिल्ह्यात यंदा १ कोटी ५१ लाख टन ऊस गाळप होण्याची अपेक्षा सुरुवातीला होती. त्यापैकी १ कोटी ११ लाख ४५ हजार १८५ टन गाळप पूर्ण झाले आहे. अद्यापही ३९ लाख ५४ हजार टन इतके ऊसगाळप बाकी आहे.